मोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू
कविता धारानी आणि तेजल गांधी... त्या दोघींना नवीन वर्षाचं जंगी स्वागत करायचं होतं.. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं झडप घातली. मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : कविता धारानी आणि तेजल गांधी... त्या दोघींना नवीन वर्षाचं जंगी स्वागत करायचं होतं.. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं झडप घातली. मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
हा आक्रोश आहे कविता धारानी आणि तेजल गांधींच्या मामांचा... अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांत्वनाला आले तरी आमच्या मुली परतणार आहेत का? असा बोचरा सवाल त्यांनी केलाय.
कविता पियूष धारानी आणि तेजल गांधी.. घाटकोपर पूर्वेला गरोडिया नगरात राहणा-या या आतेबहिणी... नववर्षाचं स्वागत करायला धारानी आणि गांधी कुटुंबीय पाचगणीला जाणार होते. त्या पाचगणी ट्रिपचं नियोजन करण्यासाठीच कुटुंबातले ७ सदस्य कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्याचवेळी तिथं भीषण आग लागली.
मोजो हॉटेलला आग लागल्याचं कळताच सर्व कुटुंबीय जागा मिळेल तिथून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. तेजल आणि कविताही धावल्या... बाहेर आगीचे लोट उसळत असल्यानं त्या स्वच्छतागृहात शिरल्या... कवितानं तिथून आपला नवरा पियूष याला फोन करून आगीत अडकल्याची माहिती दिली. दुर्दैवानं हे त्यांचं शेवटचं संभाषण ठरलं.
त्यांच्या कुटुंबातले बाकीचे सदस्य दैव बलवत्तर म्हणून बचावले. त्यांच्यापैकी आणखी एकजण भाजल्यानं जखमी झालीय. या घटनेमुळं स्थानिक नागरिकही हळहळ व्यक्त करतायत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय.
या आगीच्या घटनेची चौकशी होईल. संबंधितांवर साधक बाधक कारवाई देखील होईल. पण कविता - तेजलचा गेलेला जीव काही परत येणार नाही आणि हेच खरं वास्तव आहे.
मुंबई | मोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू