देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नालासोपारा इथं राहाणाऱ्या राहुल चव्हाण यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. व्यवसायाने रिक्षा चालक असणाऱ्या राहुल चव्हाण यांच्या पत्नी अश्विनी चव्हाण यांची मुदतपूर्व प्रसूती 19 जून रोजी मुंबईतल्या परळ इथल्या के ई  एम रुग्णालयात (KEM Hospital) झाली. नवजात बाळ (New Born Baby) सहा महिने दहा दिवसांचं होतं आणि वजन एक किलो 26 ग्राम होत. वजन फारच कमी असल्यामुळे बाळाला नवजात शिशु दक्षता विभागात ठेवण्यात आलं. बाळाच्या हाताला सलाईन (Saline) लावण्यात आली. पण या सलाईन मधून देण्यात येणाऱ्या औषधामुळे बाळाचा हात काळा पडू लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळाची आई अश्विनी चव्हाण यांनी ही गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली.  मात्र होईल बरे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पण दिवसागणिक बाळाचा हात खूपच काळा पडू लागला आणि त्याच्या हाताची बोटं वाकडी झाली. बाळाच्या हाताला संसर्ग बळवला होता. त्यामुळे कोपरापासून बाळाचा हात डॉक्टरांना कापावा लागला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा हात कापावा लागल्याचा आरोप राहुल चव्हाण यांनी केलाय. पत्नी म्हणजे अश्विनीने 15 जुलैला नवजात शिशु दक्षता विभागातील डॉक्टरांना याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यावेळीच उपचार केले असते तर बाळाचा हात कापण्याची वेळ आली नसती असा आरोप राहुल चव्हाण यांनी केली आहे.


बाळाचा हात कापावा लागला,  पण आता किमान बाळ तरी सुखरूप आम्हाला घरी घेऊन जाऊ द्या अशी विनंती राहुल चव्हाण यांनी केली आहे. बाळाला 15 ते 20 दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल असं त्यांना सांगण्यात आलं आहे. पण या गंभीर गोष्टीला कोणाला जबाबदार धरावं असा सवाल राहुल चव्हाण विचारतायत. 


याबाबत केईएम रुग्णालयानेही या संपूर्ण घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नसल्याच स्पष्टीकरण के ई एम मधील डॉक्टरांनी दिलेलं आहे. बाळाचे वजन जन्मता खूपच कमी होते. क्रिटिकल अवस्थेतील हे बाळ होते. त्याच्यावर योग्य ते सर्व उपचार डॉक्टरांकडून करण्यात आले आहेत तरीही घडलेली घटना पाहता याची उच्चस्तरीय चौकशी 15 दिवसात करण्यात येणार असं केईएम रुग्णालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ हरीश पाठक यांनी दिली आहे. 


फक्त 52 दिवसाच्या बाळाचे योग्य उपचारा अभावी जर हात कापावा लागत असेल तर हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. त्यामुळे अश्या घटना इथून पुढे होवू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी सबंधित यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे