VIDEO : इथं आपल्या नवजात बालकाचं तोंड पाहण्यासाठीही पालकांना द्यावे लागतात पैसे
मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाळंतपणानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून कर्मचारी पैसे उकळत असल्याचे यापूर्वी केवळ म्हटलं जायचं. पण आता महापालिकेच्या एका रुग्णालयातील एक चित्रफित समोर आलीय... या व्हिडिओत हे वास्तव समोर आलंय. गोरगरीब रुग्णांकडून अशा प्रकारे प्रकारे लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्या तरी हे प्रकार थांबताना दिसत नाहीत.
मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे... या व्हिडिओत महिला बाळंत झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडून या रुग्णालयातील महिला कर्मचारी पैशाची मागणी करताना स्पष्ट दिसत आहेत. नातेवाईक स्वखुशीने देत असलेली रक्कम त्या नाकारतात आणि आणखी पैशाची मागणी करतात... अखेर पुन्हा हा नातेवाईक आणखी काही पैसे या महिला कर्मचाऱ्यांच्या हाती ठेवतो आणि त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांचे समाधान होते.
मुलगा असो किंवा मुलगी... चंगळ मात्र रुग्णालयातल्या या कर्मचाऱ्यांची असते. अनेकदा तर यांच्या हातावर पैसे ठेवल्याशिवाय नातेवाईकांना नवजात बालकाचं तोंडही दाखवलं जात नाही. ही कहाणी केवळ याच रुग्णालयातली नाही. केईएम, सायन, नायर रुग्णालय असो किंवा उपनगरातल कोणतंही रुग्णालय किंवा मॅटर्निटी होम... सर्वत्र अशी लूट सुरु आहे. अगदी खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा...
पालिका रुग्णालयांमध्ये बाळंतपणासाठी येणाऱ्या महिला या गरीब कुटुंबातील असतात... मात्र तरिही त्यांना या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. कारण पैसे न दिल्यास बाळ बाळंतीणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांना चांगला पगारही मिळतो. मात्र, तरीही इथं गरीब रुग्णांची सर्रास लूट सुरु आहे. रुग्णालयातला हा प्रकार अधिकाऱ्यांना दिसत नाही का? की कळूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जातं?