मध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी
मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.
मुंबई : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.
मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कमी लोकल धावणार असून आजचे वेळापत्रक रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येतेय. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा दोन दिवस पुरती विस्कळीत झाली होती.
आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेनं आपल्या वेळापत्रकात बदल केलाय. काही लाब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे सुरळीत सुरूय. काल सुट्टी देण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयं बंद होती. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले नव्हते.
दरम्यान, दोन दिवस पावसामुळे मुंबईचा वेग काहीसा कमी झाला होता. काल शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे रस्ते मोकळे दिसून येत होते. मात्र आज सकाळी कार्यालयात जाण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी दिसून येते आहे.