Navi Mumbai: मुंबईसह राज्यभरातील अनेक नव्या सुरु होणाऱ्या प्रकल्पांवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु होणे हे काही आता नवे राहीले नाही. ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये नव्या रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले. याच्या नावावरुनही आता श्रेय कोणाचे? याची स्पर्धा सुरु झाली आहे. त्याहून विशेष म्हणजे काही दिवसांच्या कालावधीतच रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिघा रेल्वे स्थानकाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून मागच्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यात आता स्थानकाला दिलेल्या नावामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. तत्कालीन खासदार संजीव नाईक यांच्या काळामध्ये दिघा रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खासदार राजन विचारे यांच्या काळामध्ये सन 2016 मध्ये रेल्वे स्थानकांच्या कामाचे भूमिपूजन झाले. आता रेल्वे स्थानक सुरु होऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. पण प्रत्यक्षात काम सुरु व्हायला 2018 उजाडले. 


यावेळी स्थानकाला दिघा नाव ठेवावे अशी मागणी करण्यात आली होती. गुगलमध्ये दिघे नाव दिसू लागले. एवढेच नव्हे तर महसूलमध्ये दिघे नावाची नोंद झाली. यानंतर स्थानकावरही दिघे नावाचा फलक प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी लावण्यात आला. पण स्थानिकांनी दिघेऐवजी दिघा असे नाव द्यावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार दिघा नावाचा फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाला दिघा नाव असल्याने या स्थानकाला दिघा नाव देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता पुन्हा दिघा रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद निर्माण होणार असे वाटले होते. पण आमदार गणेश नाईक यांनी यामध्ये मध्यस्थी करुन हा विषय हाताळला. त्यांनी दिघा नावाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 


या भेटीतील चर्चेनंतर राज्य सरकारने दिघा गाव स्थानक नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर दिघा, दिघे नावाऐवडी अखेर दिघा गाव रेल्वे स्थानक नाव अंतिम ठरले. केंद्राने दिघे गाव या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता ठाणे ते ऐरोलीमधील नव्या स्थानकाला दिघा गाव अशी ओळख मिळाली आहे. या नावाचा फलक रेल्वे स्थानकावर लावण्यात आला आहे. दिघा गाव रेल्वे स्थानकाची पाहणी सर्व पक्षीय नेत्यांकडून सुरु आहे. त्यात दिघा, दिघे आणि दिघा गाव या नामांतरात वेळ गेल्याने उद्घाटन लांबणीवर गेले आहे. रेल्वे स्थानक होण्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी स्थानकाची पाहणी तसेच पाठपुरावा केला. 


दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले यांनीदेखील दिघा गाव रेल्वे स्थानक सुरु होण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. आता दिघा गाव नाव अंतिम झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. यात स्थानक लवकरात लवकर सुरु करुन आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. विठावा, पारसिक हील परीसरातील नागरीकांना वाशी-पनवेलसाठी ठाणे स्थानकापर्यंत यावे लागते. पण दिघे गाव रेल्वे स्थानक सुरु झाल्यानंतर येथून पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे.