Mumbai Local Train News: मुंबई लोकलमधून दररोज हजारो जण प्रवास करतात. काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षांच्या तरुणीचे एका माथेफिरुने केस कापल्याची घटना समोर आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. भरगर्दीत तरुणीचे केस कापल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने तरुणीचे केस का कापले याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका लोकप्रिय महाविद्यालयातील पीडित विद्यार्थिनी लेडिज स्पेशल लोकलमधून कल्याण ते माटुंगा रोड असा प्रवास करत होती. त्यासाठी ती सकाळी 9.29 च्या सुमारास दादर स्थानकात पोहोचली होती. ती पश्चिम रेल्वेच्या फूट ओव्हर ब्रिजकडे चालत असताना तिच्या मागून एक अज्ञात व्यक्ती आला आणि त्याने तिचे केस कापले. 


तरुणीला संशय आला तेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा एक व्यक्ती पळून जाताना दिसला. त्यानंतर तिच्या लक्षात आले की त्या व्यक्तीने तिचे केस कापले आहेत. तिने तात्काळ रेल्वे पोलिसांना या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्या तपासून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीत तो आरोपी तरुणीचे केस कापताना दिसत आहे. तसंच तिने मागे वळून बघताच आरोपी कैची बॅगेत टाकून तिथून पळ काढला. 


मुंब्र सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा शोध घेतला. आरोपी चेंबूर येथील रहिवासी असून त्याने नाव दिनेश गायकवाड असं आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. 


घटना घडलेल्या ठिकाणीच मंगळवारी पोलिसांनी या अरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी एका कंपनीत कामाला असून तो मनोरुग्ण नसल्याचेही स्पष्ट झालं आहे. दिनेशने पोलिसांना सांगितले की, त्याला महिलांचे लांब केस आवडत नाहीत. त्यामुळं त्याने हा प्रकार केला आहे. याआधी ऑगस्ट 2024मध्येही त्याने एका 40 वर्षांच्या महिलेचे केस अशाचप्रकारे कापल्याची माहिती समोर आली आहे. 


आरोपीला अटक केल्यानंतर त्याने आत्तापर्यंत अशा कित्येक महिलांसोबत असा प्रकार केला याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, या घटनेमुळं लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला प्रवासी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.