Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
Mumbai Local Megablock : सुट्टीचा दिवस म्हटलं की, अनेक मंडळी घराबाहेर पडतात. भटकंतीपासून भेटीगाठींपर्यंतचा बेत या सुट्टीच्या निमित्तानं आखला जातो. त्यातही सध्याची वाहतूक कोंडी पाहता किमान वेळात कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतून अनेकांचीच पसंती मुंबई लोकलला असते. रविवारी म्हणजेच 19 मे 2024 च्या दिवशी मुंबई लोकलनं प्रवास करायचा बेत असेल तर आताच प्रवासासाठीचे इतर पर्याय तयार ठेवा किंवा प्रवासाच्या वेळेची योग्य आखणी करा. कारण, रविवारी रेल्वे मार्गावर असणाऱ्या मेगाब्लॉकमुळं मोठ्या संख्येनं प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
उपनगरीय रेल्वे रुळांवरील दुरूस्तीकाम आणि सिग्नल यंत्रणेसंदर्भातील तांत्रिक काम हाती घेण्यात येणार असल्यामुळं मध्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. तर, हार्बर मार्गावर कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र कोणत्याची अडचणींचा सामना करावा लागणार नाही, तरीही मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं या मार्गावरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : आठवडी सुट्टीवर पावसाची नजर; सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या' भागांमध्ये वादळाचा इशारा
मेगाब्लॉकमुळं मध्य रेल्वेवर कोणते बदल?
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान CSMT वरून सुटणाऱ्या Fast Local माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. तर, ठाण्यापासून पुढे या लोकल पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंग्यादरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील आणि पुढे त्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. लोकलच्या अपेक्षित स्थानकात पोहोचण्यच्या वेळांमध्ये साधारण 15 मिनिटांचा उशिर अपेक्षित आहे, त्यामुळं प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवासाची आखणी करावी.
मेगाब्लॉकचा परिणाम हार्बर मार्गावरही होणार असून, मध्य रेल्वेप्रमाणंच सकाळी 11.10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मनिटांपर्यंत हा ब्लॉक कालावधी असेल. यादरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. तर सीएसएमटीहून पनवेल, वाशी आणि बेलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलही बंद राहतील. यादरम्यान ठाणे, वाशी आणि नेरुळ स्थानकांमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.