Mumbai News : विविध अभियांत्रिकी कामांसाठ मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (harbour railway) रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करायला हवं. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून ब्लॉक सुरु होणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर (western railway) रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे येथून अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर माटुंग्यानंतर पुन्हा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.


मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक


ठाणे स्थानकात सीएसएमटी दिशेकडे फलाट क्रमांक 2/3 वर पादचारी पुलाचे चार गर्डर्स लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री 12.30 ते रविवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे शनिवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल रात्री 11.12 वाजताची सीएसएमटी ते ठाणे लोकल सुटेल. त्यानंतरच्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जत, कसारा दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. ब्लॉकनंतर पहिली अप दिशेकडील लोकल कल्याणहून पहाटे 5.21 वाजता सीएसएमटीसाठी सुटेल. ब्लॉकनंतर डाऊन दिशेकडील पहिली लोकल सकाळी 6.23 वाजता विद्याविहारवरून टिटवाळ्यासाठी सुटेल.


हार्बर रेल्वे


हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 या काळात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि बेलापूरहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द या दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.