Good News! लोकलमधून उतरून थेट मेट्रो पकडा, `हा` मेट्रो मार्ग पश्चिम रेल्वे आणि महामार्गांना जोडणार
Mumbai Metro News Update: शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण होत आहे. या वर्षात लवकरच दोन मेट्रो धावणार आहेत.
Mumbai Metro News Update: मुंबई शहरात लवकरच मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात जवळपास 337 किमी लांबीचे मेट्रो मार्गिका होणार आहेत. सध्या MMRDA कडून (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आठ मेट्रो मार्गिकेची कामे सुरू आहेत. यातील दोन मेट्रो नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतात. या मेट्रोचा मार्ग कसा असेल आणि प्रवाशांना त्याचा काय फायदा होणार? हे जाणून घेऊया.
मेट्रो 9मधील दहिसर पूर्व ते काशीगाव मार्गिका आणि 2 बीमधील डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाळे या दोन मेट्रो मार्गिका लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तर, एकीकडे मेट्रो 4, मेट्रो 6 या दोन मार्गिकांसाठी अद्याप कारशेडची जागा मिळालेली नाहीये. तर मेट्रो 9 आणि मेट्रो 5च्या कारशेडचं काम आत्ताच हाती घेण्यात आले आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई मेट्रो मार्ग 2 ब (डी. एन. नगर - मंडाळे )
मेट्रो मार्ग-2ब (डि. एन.नगर-मंडाळे) या मार्गाची एकूण लांबी 23.6 कि. मी. एवढी असून यामध्ये एकूण 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
सदर मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.
सदर मार्ग हा मुंबईतील पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांना जोडणारा आहे.
मेट्रो मार्ग-2बमुळे मुंबईतील व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिकद्रुष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांस रेल्वे आधारित सुविधा प्रदान होईल
मेट्रो मार्ग 2 ब पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत सुमारे 50% ते 75% बचत हि सदर मार्गामुळे होऊ शकते.
मुंबई मेट्रो मार्ग 9
मेट्रो 9 ही मुंबई उपनगर आणि मीरा भाईंदरला जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 10.08 किमीचा ही मार्गिका असून यात 8 स्थानकांचा समावेश असणार आहे. पहिले स्थानक हे दहिसर आहे. पहिल्या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव. तर, दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवा पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे.