मुंबईत पावसाची संततधार; मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने
Mumbai Local : बुधवारी ऐन गर्दीच्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Mumbai Local : मुंबईकडे लोकल ट्रेनने (Mumbai Local) येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत सतत पावसाची संततधार सुरु असून दुसरीकडे मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गोंधळामुळे मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतुकही धीम्या गतीने सुरु आहे. दरम्यान, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवाही सध्या सुरळीत करण्यात आल्या आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार बुधवारी रात्री टिटवाळ्याकडे जाताना मुंब्रा स्थानकावर येताच मुंबई लोकल ट्रेन घसरल्याची माहिती समोर आली, यामुळे काही काळ सेवा विस्कळीत झाली आणि गाड्यांच्या रांगा लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघालेली ट्रेन मुंब्रा स्थानकात येत असताना ही घटना घडली. त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, रात्री 9.20 च्या सुमारास धीमी ट्रेन स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत असताना ही घटना घडली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. ट्रेनच्या मोटरमनने ताबडतोब ब्रेक लावला आणि डबा प्लॅटफॉर्मवर घासल्याचं समजल्यावर ट्रेन थांबवली.
ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. सीएसएमटीवरून टिटवाळ्याला जाणाऱ्या गाडीचा पहिला डबा रुळावरून घसल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.
दरम्यना, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मध्य रेल्वेने ट्वीट केलं होतं. "मुंब्रा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल- प्लॅटफॉर्मच्या साईडला रेल्वेचा रेल्वेचा डबा घासल्यामुळे कर्मचार्यांनी रेल्वेची तपासणी केली. यात सगळं सामान्य आढळलं," असे मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.