Mumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
Mumbai Local Mega Block : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या सर्वांसाठीच लोकलचं वेळापत्रक अतीव महत्त्वाचं. कारण, एकदा हे वेळापत्रकच कोलमडलं तर, मुंबईकरांचा दिवसभराचा प्रवासच गोंधळतो. त्यातही रविवारी असणारा मेगाब्लॉक शहरात ये- जा करणाऱ्यांपुढं अनेक आव्हानं उभी करतो. पण, यंदाच्या रविवारी मात्र प्रवाशांना हा मनस्ताप होणार नाहीये. कारण, रविवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरच मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक नसेल त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार नाहीये. शिवाय सुट्टीच्या दिवशी आखलेले नियमही कोणाला बदलावे लागणार नाहीयेत.
मेगाब्लॉक काळात नेमके कोणते बदल असतील?
रविवारी विविध तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यानुसार ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटीहून सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि या दिशेनं येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा किमान 10 मिनिटं उशिरानं पोहोचतील आणि सुटतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : पुढील 24 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार
ब्लॉक काळात मुलुंडहून सकाळी 10 वाजून 43 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर, या लोकल ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. निर्धारित अंतिम स्थानकांवर मात्र या लोकल 10 मिनिटं उशिरानं पोहोचली.
कल्याणहून सकाळी 10 वाजून 36 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी फास्ट लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंडहून त्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल प्रवासातही 10 मिनिटांचा उशिर अपेक्षित आहे.