रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local News : रविवार म्हटलं की घरात बसून काय करायचं, चला कुठेतरी जाऊ असं म्हणत अनेकजण भटकंतीसाठी निघतात. त्यातही मुंबईसारख्या शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ लक्षात घेता अनेकांचीच पसंती रेल्वे प्रवासाला असते. दैनंदिन स्तरावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडाही लक्षणीयरित्या मोठा. पण, त्यातही तुमची भर पडणार असेल, अर्थात रविवारी सुट्टीच्या निमित्तानं तुम्हीही रेल्वे प्रवासाचा बेत आखत असाल तर आताच ही बातमी पाहा. कारण, रेल्वे वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
रविवारी मेगाब्लॉक
रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामं हाती घेण्यासाठी म्हणून रविवारी, 13 ऑगस्ट रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी याची नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकच्या वेळा आणि प्रवासातील बदल
रविवारी मध्य रेल्वेवर (Central Railway) माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. परिणामी CSMT वरून निघणाऱ्या जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थआनकादरम्यान डाऊन जलद मार्गावरुन धावतील. तर, ठाण्यावरून निघणाऱ्या जलद लोकल मुलुंड- माटुंग्यादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावणार आहेत. परिणामी रविवारच्या रेर्लेव प्रवासादरम्यान अपेक्षेपेक्षा जास्त वेळ दवडला जाऊ शकतो ही बाब लक्षात घ्यावी.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
नवी मुंबईच्या दिशेनं निघणार असाल तर हे बदलही पाहूनच घ्या...
मध्य रेल्वे प्रमाणं हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. इथं मानखुर्द आणि नेरुळ अप- डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. दरम्यानच्या काळात मानखुर्द ते नेरुळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्ददरम्यान काही विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. मुख्य हार्बर मार्गावरील वाहतूक पाच तासांसाठी बंद राहिली तरीही प्रवाशांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावरील पर्याय खुले राहतील याची नोंद घ्यावी.