मुंबईकरांनो आज सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Mumbai Local Megablock : बाहेर मस्त पाऊस पडतोय तर आज सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने लोकलचं बदलेलं वेळापत्रक जाणून घ्या.
Mumbai Local Megablock : आज रविवारी मुंबईत यलो अलर्ट जारी (yellow alert in mumbai) करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरानो आज पावसाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य मार्गावर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.25 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान डाउन जलद मार्गावरील लोकल या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. तर ठाण्यापुढे या लोकल सेवा डाउन जलद मार्गावरुन धावणार आहेत. मेगाब्लॉकदरम्यान वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावणार आहे.
ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकल सेवा या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावरून धावणार आहेत. तर त्यानंतर अप जलद मार्गावरुन पुन्हा धावणार आहेत. मेगाब्लॉक दरम्यान लोकल सेवा या वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
पनवेलहून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही आज मेगाब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे.
पण मुंबईकरांचे हाल होऊ नये म्हणून ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. तर मेगाब्लॉक दरम्यान ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल धावणार आहेत.