Mumbai Local Train Update: लोकल ही सर्वसामान्यांची लाइफलाइन मानली जाते. उपनगरातून मुंबईत येण्यासाठी लोकल हीच एकमेव साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोकलची गर्दी वाढत चालली आहे. तसंच, मेगाब्लॉक असल्यास गर्दीत आणखी वाढ होते. या वेळी रेल्वेचे वेळापत्रकदेखील बदलले जाते. सध्या दिवाळीमुळं नोकरदार वर्गाला सुट्टी आहे. मात्र, अनेक असे नोकरदार आहेत जे सुट्टीच्या दिवसांतही ऑफिसला जात आहेत. अशातच रेल्वेने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वेळापत्रकात बदल केले आहेत. लोकलचे वेळापत्रक बदल करत रविवारप्रमाणे चालवण्यात आले आहेत. त्यामुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारप्रमाणे वेळापत्रक लावल्याने काही लोकल उशिराने धावत होत्या तर काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर, एसी लोकलदेखील काही रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळं दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांची हैराणी झाली. तसंच, लोकल रद्द करण्यात आल्यानंतर घोषणाही करण्यात येत नव्हती. त्यामुळं प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खोळंबा झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. 


रेल्वेने वेळापत्रक 31 ऑक्टोबरपासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत रविवारी चालवण्यात येणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. मात्र याआधी कोणतेही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सर्व शासकीय कार्यलये आणि बँका सुरू असताना रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाचा अवलंब कसा केला, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. 


दिवाळीसाठी विशेष रेल्वेगाड्या


मध्य रेल्वे लांब पल्ल्याच्या 583 गाड्या सोडणार आहेत. यात आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही गाड्यांचा समावेश आहे.  प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर विभागातून उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपुर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.