मुंबई : मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ४२३ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या आधी पश्चिम रेल्वेनेही लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने त्यांच्या विशेष लोकलच्या फेऱ्या ३५५  वरुन ४२३ फेऱ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज २४ सप्टेंबरपासून ६८ अधिकच्या फेऱ्या मध्य रेल्वे चालवणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रोज गर्दीतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


कोविड-१९चा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी कमी करण्यावर भर देण्यासाठी या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. उशिरा का होईना पण मध्य रेल्वेने विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय आज जाहीर केला. एकूण ६८ पैकी ४६ फेऱ्या या मध्य रेल्वेवर तर २२ फेऱ्या हार्बर रेल्वेवर वाढवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे वरील अधिकच्या फेऱ्यांमध्ये कसारा ते सीएसएमटी दरम्यान ९, कल्याण ते कसारा दरम्यान ६, कर्जत ते सीएसएमटी दरम्यान ९, ठाणे ते कर्जत दरम्यान २, कल्याण ते कर्जत दरम्यान २, अंबरनाथ ते सीएसएमटी दरम्यान ३, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान ५, ठाणे ते सीएसएमटी दरम्यान ४ तर कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान ६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 


तर हार्बर मार्गावर एकूण २२ फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये पनवेल ते सीएसएमटी दरम्यान १४ तर वाशी ते सीएसएमटी दरम्यान ८ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ते वाशी दरम्यान आधीच २ लोकलच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत.