Mumbai Local Train Time Table Update: मुंबईकरांचा प्रवास सूकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलच्या फेऱ्यात वाढ करा, अशा सूचना केल्या आहेत. लोकलमध्ये वाढत जाणारी गर्दी आणि प्रवाशांच्या तक्रारी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक काढले आहे. ऑगस्टपासून या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता दादर स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वेळापत्रकात दादर स्थानकातून १० लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, परळ स्थानकातून अतिरिक्त २४ फेऱ्या सुरू होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवे वेळापत्रक लागू होणार आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 फेऱ्या दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहे. यात 5 अप आणि 5 डाउन लोकलचा समावेश आहे. दादरमधील फलाट क्रमांक १०चे डबल प्लॅटफॉर्म झाला आहे. यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने ये-जा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 


दादर स्थानकातून सुरू होणाऱ्या २४ धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सध्या परळ
स्थानकातून २२ फेऱ्या सुटत असल्याने परळहून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या ४६वर पोहोचणार आहे. कसारा-कर्जतहून येणाऱ्या लोकलमधील बहुतांश प्रवासी दादर स्थानकात उतरतात. तसेच दादर स्थानकातून लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळं प्रवाशांना आता थेट दादरमधूनच लोकलमध्ये पकडणे सोपं जाणार आहे. कल्याण-कसारासाठी आता दादर स्थानकातून लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळं सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलचा खोळंबा टाळण्यासही मदत होणार आहे. 


ठाणे-कल्याणसाठीही जादा लोकल


कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना नव्या वेळापत्रकात दिलासा मिळाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत एका अतिरिक्त लोकलला थांबा देण्यात आला आहे. ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळं एकंदरीतच प्रवाशांना या नव्या वेळापत्रकातून मोठा दिलासा मिळणार आहे. 


फर्स्ट क्लासमध्ये लोकलमध्ये घुसणाऱ्यांवर कारवाई


प्रथम श्रेणीमध्ये विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढते आहे. यामुळे नियमित तिकीट / पासंधारक प्रवाशांपेक्षा विनातिकीट प्रवाशांचाच प्रवास सुकर होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. जून महिन्यात प्रथम श्रेणीतून १४,१९६ प्रवाशांवर आणि एसी लोकलमधील ७,८८६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.