लोकल रिव्हर्स धावू लागली! अनेकांच्या धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या; `मरे`वरील धक्कादायक घटना
Mumbai Local Train Platform Over Shooting: कोणतीही पूर्व कल्पना न देता ट्रेन उलट्या दिशेनं जाऊ लागल्याने स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. या गोंधळामध्ये अनेक प्रवाशांनी धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्याचंही पाहायला मिळालं.
Mumbai Local Train Platform Over Shooting: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी एक विचित्र घटना घटना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन चक्क रिव्हर्स घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. मात्र यामुळे या ट्रेनमधील प्रवाशांची भंबेरी उडाल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन रे रोड स्थानकावर ठरलेल्या जागेपेक्षा पुढे थांबली.
अनेकांच्या धावत्या ट्रेनमधून उड्या
रेल्वेने निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्म थांब्याऐवजी ट्रेन बरीच पुढे गेली. लॅटफॉर्म ओव्हर शुटिंगच्या घटनेमुळे लोकल प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म सोडून तब्बल 3 डब्बे पुढे जाऊन थांबली. मात्र मोटरमनला ही चूक लक्षात आल्यानंतर ट्रेन मागे म्हणजेच विरुद्ध दिशेला घेत प्लॅटफॉर्मवर थांबवण्यात आली. अचानक सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन त्याच ट्रॅकवर रिव्हर्स चालू लागल्याने ट्रेनमधील प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. प्रवाशांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण नर्माण झालं. पुढे गेलेल्या 3 डब्ब्यांमधील प्रवाशी वगळल्यास अन्य डब्यांमधील काही प्रवाशांनी तर प्लॅटफॉर्मला थांबलेली लोकल रिव्हर्समध्ये धावू लागल्याने ट्रेन नियोजित जागी थांबवण्याआधीच धावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर उड्या घेतल्या.
नक्की घडलं काय?
सदर घटना शनिवारी संध्याकाळी घडली. पनवेल-सीएसएमटी लोकल रात्री 8 च्या सुमारास रे रोड स्टेशनजवळ आली. मात्र ही लोकल प्लॅटफॉर्मवरील ईएमयू थांब्याच्या निशाणा जवळ थांबव्याऐवजी 3 डब्ब्यांचं अंतर अधिक जात पुढे जाऊन थांबली. त्यामुळे पुढील 3 डब्ब्यांमधील प्रवाशांना गाडीमधून उतरताच येत नव्हते. हे काय सुरु आहे याची कल्पना न आल्याने ट्रेनमधील प्रवासी घाबरले. दरम्यान मोटरमनने रेल्वे कर्मचारी आणि गार्डच्या मदतीने लोकल पुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकल मागील दिशेने चालू लागल्याने आणि यासंदर्भात कोणतीही उद्घोषणा करण्यात आली न आल्याने आधीपासूनच पलाटावर थांबलेल्या मागील 9 डब्यांमधील प्रवासी घाबरले. त्याच ट्रॅकवर लोकल उलट्या दिशेने चालू लागल्याने अनेकांनी धावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर उड्या घेतल्या.
नक्की वाचा >> धक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
सुदैवाने कोणीही जखमी नाही
मागील 9 डब्यांमधील अनेक प्रवाशांनी धावत्या लोकलमधून उड्या मारल्या तरी सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. 3 डब्ब्यांचं अंतर पुढे गेलेली लोकल पुन्हा निश्चित जागेवर आणण्यासाठी 5 ते 6 मिनिटांचा वेळ गेला. या प्रकरणामध्ये आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.