धक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Mumbai Local Train Updates: प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे डब्बे नेहमीपेक्षा अधिक हलत असल्याचं दिसून आल्याने रेल्वे मजुराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर जे काही त्याला दिसलं ते पाहून धक्काच बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 11, 2024, 10:45 AM IST
धक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ title=
रविवारी घडला हा संपूर्ण प्रकार

Mumbai Local Train Updates: रविवारी मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये एक विचित्र घटना घडला. येथील प्लॅट फॉर्म क्रमांक 4 वरुन दुपारी पावणेचारच्या सुमारास अत्यंत वेगाने एक लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी गेल्यानंतर रेल्वे रुळ वाकडे झाले. येथे काम करणाऱ्या रेल्वे मजुराच्या हे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गावरील वाहतूक रेल्वे रुळांची दुरुस्ती होईपर्यंत 2 तास बंद ठेवण्यात आली होती. मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये आधीपासूनच रुळांचे काम सुरु आहे. रविवारी दुपारी 4 वाजता मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एक्सप्रेसचे डब्बे नेहमीपेक्षा अधिक हलताना दिसल्याने कर्मचाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रेल्वे गेल्यानंतर त्याने रुळ पाहिले असता ते वाकडे झाल्याचं निदर्शनास आलं. त्याने याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पुढली लोकल पलाटाच्या आधीच थांबवण्यात आली आणि प्रवाशांना पोलीस, आरपीएफच्या मदतीने उतरवून वाहतूक काही काळ स्थगित करुन रुळांचं काम करण्यात आल्यानंतर या मार्गावरुन गाड्या सोडल्या.

गाड्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरुन वळवल्या

पलाटाआधी थांबवलेली लोकल प्रवासी उतरवल्यानंतर अत्यंत धिम्या गतीने पलाटाच्या पुढे थांबवण्यात आली. त्यानंतर युद्धपातळीवर रेल्वेच्या रुळांचं दुरुस्तीचं काम करण्यात आलं. रेल्वेची वाहतूक या मार्गावरुन बंद ठेवण्यात आल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर वळवण्यात आल्या. रविवारचा दिवस असल्याने प्रवाशांची अगदी गर्दी नव्हती. तरीही रेल्वे मजुराच्या समयसुचकतेमुळे मोठा अपघात टळला. पावणेचार ते पावणेसहा दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. रेल्वेचे रुळ दुरुस्त करण्यात आल्यानंतर या मार्गावरुन वाहतूक पूर्वव्रत करण्यात आली.

गर्दीच्या दिवशी दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण?

मीरा रोड स्थानकादरम्यान रेल्वे रुळांचे काम सुरु असल्याने या भागामध्ये रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या स्थानकाच्या आसपास रेल्वे गाड्या अवघ्या 20 किमी प्रतितास वेगाने धावतात. सुरक्षेची सगळी कळजी घेत असल्याची माहिती या घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. मात्र एवढे निर्देश असतानाही एक्सप्रेस इतक्या वेगाने कशी गेली यासंदर्भात मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या प्रबंधक कार्यालयातून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र हाच गर्दीचा दिवस असता आणि मोठी दुर्घटना झाली असती तर त्यासाठी कोण जबाबदार असतं असा संतप्त सवाल रेल्वे प्रवाशांनी या घटनेनंतर विचारला आहे.