लोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल नेहमीच रखडत धावते, अशी अनेकांची तक्रार असते. लोकल उशीराने का धावते याची माहिती आता समोर आली आहे.
Mumbai Local Train Update: लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकल उशीराने धावत आहेत. लोकलमुळं अनेकदा लेट मार्कचा फटका चाकरमान्यांना बसतोय. लोकल वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. तर, 22 ऑगस्ट रोजी प्रवासी संघटनांकडून आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकातील प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास करत आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने बैठक बोलवली होती. या बैठकीत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. (Mumbai Local Train Update)
बाहेरगावच्या लेट गाड्यांना लोकलच्या आधी प्राधान्य दिले जाते. त्यामुळं लोकलचा खोळंबा होतो, अशी कबुली रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली आहे. देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा, कर्जतला येईस्तोवर आधीच त्यांना विलंब झालेला असतो. त्यामुळे त्या बाहेरगावच्या गाड्यांऐवजी लोकलला प्राधान्य दिले, तर दूरवरून आलेल्यांचा आणखी खोळंबा होईल. त्यामुळे लोकलपेक्षा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्यांना अगोदर पुढे जाण्याची संधी दिली जाते. परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लोकल दररोज उशिरा धावतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही एक तारेवरची कसरत असून, अनेक तांत्रिक अडचणीमुळे वेळापत्रक पाळले जात नाही. त्याला आमचा नाइलाज आहे, असंही रजनीश गोयल यांनी प्रवासी संघटनांना म्हटलं आहे.
लोकल प्रवासी संघटनांचे आंदोलन
दररोज सकाळी 7 ते 11 आणि संध्याकली 5 ते 10 दरम्यान लोकलमधून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. कार्यालयीन वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते, अशात लोकलची सेवा ही धीम्या गतीने सुरू असते. त्यामुळे आता प्रवसी संघटना आक्रमक झाली आहे. त्याविरोधात लोकल प्रवासी संघटना 22 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे.