मसाजदरम्यान थेरिपिस्टने मोबाईलमधून अर्धनग्न..; स्पॅनिश महिलेबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
Mumbai Police Arrested Massage Therapist: स्पॅनिश महिलेने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना फोन करुन सांगितल्यानंतर काय घडलं जाणून घ्या...
Mumbai Police Arrested Massage Therapist: मुंबईतील मालवणी परिसरामधून मुंबई पोलिसांनी एका 42 वर्षीय मसाज थेरिपिस्टला अटक केली आहे. या व्यक्तीने मढ आयलंडवर एका स्पॅनिश महिलेचे आणि तिच्या भारतीय मैत्रिणीचे व्हिडीओ चोरुन रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यक्तीला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामधील पीडिता ही 45 वर्षांची आहे. मूळची स्पेनची असलेली पीडिता मागील महिन्यामध्ये पीडित पर्यटक व्हिजावर भारतात दाखल झाली आहे. या महिलेचा व्हिजा मार्च 2025 पर्यंत वैध असल्याने ती सध्या भारतातच वास्तव्यास आहे. बंगळुरुमधून ही स्पॅनिश महिला काही दिवसांपूर्वीच मुंबईतील तिच्या मढ आयलंडमधील एका मैत्रिणीच्या घरी वास्तव्यासाठी आली होती. सोमवारी तिने सोशल मीडियावरुन येथील एका स्थानिक मसाज सर्विस सेंटरशी संपर्क साधला. यानंतर या मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या मसाज थेरिपिस्टने मंगळवारी पाडितेच्या मैत्रिणीच्या घरी आला. आपण महिला आणि पुरुष दोघांनाही मसाज सेवा देतो असं या व्यक्तीचं म्हणणं होतं. या व्यक्तीने पीडितेच्या मैत्रिणीला मसाज करण्यास सुरुवात केली. मात्र तो तिचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. मात्र चुकून असं झालं असेल असा विचार करत भारतीय महिलेने कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र त्यानंतर तक्रारदार स्पॅनिश महिलेला मसाज करताना असाच अनुभव आला.
मोबाईलमध्ये लपूनछपून शुटींग
मसाज करताना या थेरिपिस्टने लपूनछपून आपले आणि आपल्या मैत्रिणीचे अर्धनग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढण्याची शंका या स्पॅनिश महिलेला आली. तिने या थेरिपिस्टला जाब विचारला असता त्याने उलट उत्तर दिली. तसेच स्पॅनिश महिलेने काही चुकीचं केलं नसेल तर तुझा मोबाईल दाखव अशी मागणी केली असता हा थेरिपिस्ट आरडाओरड करु लागला. त्यामुळे त्याने मोबाईलमध्ये लपूनछपून रेकॉर्डींग केल्याच्या शंकेला अधिक वाव मिळाला आणि या महिलेला वाटलेली भीती खरी ठरली.
पोलिसांना फोन केला अन्...
स्पॅनिश महिलेने तातडीने मालवणी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तक्रारदार महिलेने केलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी थेरिपिस्टला अटक केली आहे. त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मालवणी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी 'मिड डे'शी बोलताना दिली. आरोपीला बोरीवली जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आल्यानंतर आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.