मुंबई : सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील लहान-मोठी गोष्ट सोशल मीडियात व्यक्त करतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका व्यक्तीने चक्क व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर आत्महत्येचा मेसेज पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या मित्रांनी स्टेटस वाचल्यानंतर यासंदर्भात पोलिसांना कळवलं आणि मग त्याचे प्राण वाचले.


मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय व्यक्तीने व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्या करण्यासंदर्भात मेसेज पोस्ट केला होता. हा मेसेज त्याचा मित्राने पाहिला आणि त्याची माहिती पोलिसांना कळवली.


पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखुन तात्काळ त्या व्यक्तीच्या घरी दाखल झाले. त्या तरुणाच्या घराचा दरवाजा आणि खिडकी बंद होते. त्यावेळी तो आत्महत्या करण्याची तयारी करत असल्याचा पोलिसांना अंदाज आला. त्यामुळे पोलिसांनी खिडकी उघडत तब्बल १५ मिनिटं त्या तरुणाला समजावलं.


पोलीस निरीक्षक देव बांगड आणि कॉन्स्टेबल अनिल सुळे यांनी त्या व्यक्तीला समजावल्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडला. साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं आपल्या पत्नीसोबत भांडण झालं होतं त्यामुळे तो दु:खी होता. तसेच तळमजल्यावर राहणाऱ्या आई-वडीलांसोबतही त्याचे चांगले संबंध नव्हते.


त्या व्यक्तीच्या मित्राने स्टेटस पाहीले आणि त्याने पोलिसांना माहिती दिली त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आलं.