मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, निवडणुकीच्या कामाला जुंपल्याचा आरोप
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या प्रिती अत्राम-दुर्वे यांनी काही तासांपूर्वी अखेरचा श्वास घेतला
मुंबई : काविळीनं जर्जर असतानाही निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं मंत्रालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला आहे. प्रिती अत्राम-दुर्वे असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या प्रिती अत्राम-दुर्वे यांनी काही तासांपूर्वी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, काविळ झालेली असतानाही निवडणुकीचं काम करायला लावल्याने आजार बळावला आणि त्यामुळे प्रिती यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
यावर, प्रिती अत्राम यांनी आपल्याला 'आजारी असल्यानं सुट्टी द्यावी' असं कुठलंही पत्रं दिलं नव्हतं. उलट जेव्हा त्यांनी बरं वाटत नसल्याचं सांगितलं तेव्हा आपणच त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांना घरी न पाठवता रुग्णालयात हलवलं, अशी प्रतिक्रिया प्रिती यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी दिलीय.