दिनेश दुखंडे / कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई तुंबली पण आम्ही नाही पाहिली, अशी स्थिती झालीय मुंबईच्या महापौरांची... शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबलेलं असताना, त्याचा मुंबईकरांना त्रास झालेला असतानही मुंबईच्या प्रथम नागरिकांना मात्र हे मान्य नाही... आता महापौर विश्वनाथ महाडेश्वर आजारच मान्य नसेल, तर ते त्यावर इलाज कसा करणार? हा प्रश्न मुंबईकरांना पडलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग्ज सर्कल... सायन... सायन - माटुंगा रेल्वे मार्ग... चेंबूर... या भागांत आज पावसाचं साचलेल्या पाण्यातून मुंबईतील पावसाची परिस्थिती दिसून येत होती. पाण्यात बंद पडलेली बेस्ट बस, ट्रक... गुडघाभर पाण्यातून चालताना सुरू असलेली मुंबईकरांची उडालेली त्रेधातिरपट... खुद्द मुंबई महापालिका प्रशासनानं पाणी तुंबल्यामुळे ९ ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याचं जाहीर केलं... उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात तुलनेनं कमी पाऊस झाला. मात्र, तरीही सायन आणि आसपासची अनेक ठिकाणं पाण्याखाली गेल्याचं दिसलं... पण ही जी दृष्यं तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर बघताय, ती खोटी आहेत, असं स्वतः महापौरांचं म्हणणं आहे... त्यांच्या मते मुंबईत पाणी तुंबलेलंच नव्हतं. 


महापौर महाशय... तुम्ही म्हणता तसं असेल तर मग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात काय वेगानं धावणाऱ्या मुंबईचा आढावा घेण्यासाठी आले होते का? कदाचित महापौर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बिझी असतील... त्यामुळेच त्यांना तुंबलेली मुंबई दिसलीच नसेल. पाऊस सुरू झाल्यापासून मुंबईत झाडं पडून आणि नाल्यांमध्ये पडून तब्बल १२ जणांचा मृत्यू झालाय. अर्थात, या जीवितहानीलाही निसर्ग जबाबदार आहे, असं महापौर म्हणू शकतात म्हणा...


विरोधकांनी  महाडेश्वरांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. यावर्षी १५४ कोटी खर्चून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेनेनं केला होता. नेहमीप्रमाणे हे दावेही पावसाळ्याच्या सुरूवातीलाच धुतले गेलेत... आता आपलं अपयश मान्य करून आता तरी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे... पण मुंबई तुंबलीच नाही, असं महापौरांना म्हणायचं असेल, तर मुंबईकरांना केवळ वरूणराजाच वाचवू शकतो...