मुंबई : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माहुल वसाहतीला भेट दिली. मात्र माहुलवासीयांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. माहुलवासीयांच्या व्यथा वारंवार झी २४ तासने मांडलीय. इथे राहणारे नागरिक अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. मान्सून आधी इथल्या स्थितीचा पाहणी करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर गेले होते. मात्र तिथे त्यांना बाऊन्सर्सचा आसरा घ्यावा लागला. ३० जून २०१७ या दिवशी महापौरांनी इथे स्वच्छता आणि प्राथमिक सुविधा प्रदान करण्याचे आदेश दिले होते. पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात महापौर माहुलच्या दोन गल्ल्यातून फिरले. अनेक ठिकाणी स्थानिक महिला त्यांना जाब विचारण्यासाठी अडवत होत्या. मात्र महापौर त्यांच्याशी संवाद साधू इच्छित नव्हते. जमाव वाढायला लागला हे पाहिल्यावर महापौर महाडेश्वर, विशाखा राऊत, दिलीप लांडे या नेत्यांनी इथून काढता पाय घेतला. माहुलवासियांच्या समस्येला सरकार कारणीभूत असून ज्या बिल्डरने ही घरं बांधली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापौरांनी केलीय. 



नाणारवासियांच्या पाठीशी ठाम उभी राहणारी शिवसेना माहुलवासियांच्या पाठिशी कधी उभी राहणार, महापौरांनी आदेश देऊन वर्ष उलटलं तरी त्याची अंमलबजावणी का होत नाही. नागरिक एवढ्या तीव्रपणे भावना व्यक्त करत असतील तर ही वेळ त्यांच्यावर का आली याचा विचार महापालिकेने करण्याची गरज आहे.