पावसाळ्याच्या आधीच प्रवास वेगवान होणार; मेमध्ये मुंबईकरांना मिळणार Good News
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो लाइन 3 चा पहिला टप्पा या मे अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC)ने 12 मार्च रोजी आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स(BKC) या मार्गावर एक चाचणी घेतली आहे. त्यामुळं मे महिन्यांच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आरे-बीकेसी पहिल्या टप्प्यातील काम 94.7 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Mumbai Metro 3 First Phase)
मुंबईकरांचा प्रवास वाहतुक कोंडीमुक्त व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. महामुंबईत मोठ्या प्रमाणात उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. देशातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो-3 प्रकल्पाचे बहुंताश काम पूर्ण झाले आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेतील पहिले स्थानक कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 26 स्थानके असणार आहेत. विशेष म्हणजे, या 2 स्थानकांपैकी आरे हे एक स्थानक जमिनीवर आहे तर उर्वरीत सर्व स्थानके भूमिगत असणार आहेत. बीकेसी ते आरे असा पहिला टप्पा मेअखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे.
9 गाड्या सेवेत
बीकेसी ते आरे या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मेट्रो 3 लाइनसाठी मेट्रोचे डबे आरे येथील 33 एकरच्या यार्डमध्ये जातात. आरे ते बीकेसी या मार्गावर नऊ गाड्या आणि 10 स्थानकांचा समावेश असणार आहे. या नऊ गाड्यांपाकी सात गाड्या सतत सेवेत असणार आहे. तर, दोन देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ताशी ८५ किमी वेगाने १६ किमी अंतर कापण्यासाठी या मेट्रो गाड्या सज्ज आहेत.
17 लाख नागरिक प्रवास करतील
मेट्रो 3 लाइनच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर सकाळी 6 ते 11 यावेळेत दररोज 260 फेऱ्यांचा प्रस्ताव आहे. या मार्गावर दररोज 17 लाख नागरिक प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यातील स्थानके
आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ, सहार रोड, विमानतळ टर्मिनल, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके असणार आहेत. मेट्रो 3 मार्ग मेट्रो-1, 2,6 आणि 9 बरोबर मोनो रेल्वेशी ही जोडण्यात येणार आहे. याशिवाय उपनगरीय रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच मुंबईतील विमानतळांशी जोडली जाणार आहे.