मेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणार
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 मार्गिका उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडली जाणार आहे. मेट्रो स्थानकातून उतरल्यावर प्रवाशांना थेट विमानतळ, उपनगरी रेल्वे स्थानकांत पोहोचता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 ही 33.5 किमी लांबीची मेट्रो मार्गिका असून या मेट्रो मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीला पहिल्या टप्प्यापर्यंत सुरू होणार आहे. या मार्गिकेवर 10 स्थानके असणार आहे. आरे ते बीकेसीपर्यंतचा हा पहिला टप्पा असून यामुळं मुंबईकरांचा प्रवास 20 मिनिटांत होणार आहे. मेट्रो मार्गिकांवरुन अन्य ठिकाणीही जोडणी देण्यात आली आहे.
कोणत्या स्थानक कधी जोडणार?
बीकेसी-मेट्रो 2 बीच्या आयटीओ स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी स्काय वॉक, ट्रॅव्हलेटरची उभारणी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1- विमानतळ टर्मिनल 1 ला रस्त्यावरील पादचारी मार्गाने तर सबवेद्वारे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणी देणार
विमानतळ टर्मिनल 2-आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 तसंच, मेट्रो 7 अ मार्गिकेला जोडणार
मरोळ नाका-मेट्रो 1 मार्गिकेच्या मरोळ मेट्रो स्थानकाला जोडणार
आरे जेव्हीएलआर-मेट्रो 6 मार्गिकेच्या सीप्झ व्हिलेज स्थानकाला जोडणार
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिकेची जोडणी
चर्चगेट मेट्रो पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाला जोडण्यात येणार आहे. पादचारी मार्गाने तसेच सबवेद्वारे ही दोन्ही स्थानके जोडण्यात येणार.
सीएसएमटी मेट्रो स्थानक-सीएसएमटी रेल्वे टर्मिनलला सबवेद्वारे जोडणार
जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो स्थानक- मुंबई सेंट्रल स्थानक आणि एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल स्थानकांना जोडण्यात येणार आहे.
महालक्ष्मी स्थानकाला मेट्रोची जोडणी देण्यात येणार आहे. तसंच, मोनोरोल स्थानकाला फुट ओव्हर ब्रीजद्वारे जोडणी दिली जाणार
मेट्रो स्थानकांची नावं बदलणार
मुंबई मेट्रो 3 स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
या स्थानकांची नावं बदलण्यात येणार
1) सीएसएमटी मेट्रो- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो
2) मुंबई सेंट्रल मेट्रोः जग्गनाथ शंकर शेठ मेट्रो
3)सायन्स म्युझियमः सायन्स सेंटर
4) शितलादेवी टेंम्पलः शितला देवी मंदिर
5) विद्यानगरीः वांद्रे कॉलनी
6) सांताक्रुझः सांताक्रुझ मेट्रो
7) डोमेस्टीक एअरपोर्टः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T1
8) सहार रोडः सहार रोड
9) इंटरनॅशनल एअरपोर्टः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-T2
10) एमआयडीसीः एमआयडीसी-अंधेरी
11) आरेः आरे जेव्हीएलआर