मुंबई पालिका मुख्य लेखापरीक्षक - आयुक्त मेहता यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे
पालिका मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
मुंबई : पालिका मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतरही त्याबद्दल कार्यवाही होत नसल्यामुळे बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केलीय.
आपली बदली करण्याचे अधिकार फक्त राज्य सरकारलाच असल्याचा बनसोडे यांचा दावा आहे. बनसोडे हे राज्य सरकारच्या फायनान्स विभागाचे जॉईंट डायरेक्टर आहेत. महापलिका अधिनियमातील दुरुस्तीनुसार राज्य सरकारने त्यांची मुंबई पालिकेत मुख्य लेखापरीक्षक पदी नेमणूक केली होती.
बनसोडे सुमारे वर्षभर या पदावर कार्यरत होते. मात्र ३ जुलैला आयुक्त अजोय मेहता यांनी त्यांना पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत पाठवत असल्याचे आदेश काढले. बनसोडे यांची बदली करताना त्यांच्यावर प्रशासकीय कामकाजात अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मात्र, आयुक्तांच्या या आदेशाना बनसोडे यांनी लगेच उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर २६ जुलैला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या बदली आदेशाला स्थगिती दिली. न्यायालयाचे आदेश महापालिका प्रशासनापुढे सादर केले असतानाही त्यावर कार्यवाही होत नसल्याचे बनसोडे यांचे म्हणणे आहे.