काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला (Corruption in Mumbai Municipal Corporation) वाचा फोडण्यासाठी ठाकरे गट येत्या एक जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. पण त्यानंतर ठाकरे गटाकडून चारही बाजूंनी कारवाईला वेग आला आहे. कोव्हिड सेंटर कथित घोटाळा (Covid Center Scam) प्रकरणी ईडीने (ED) ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि आज ठाकरे गटाच्या शाखेवरच हातोडा मारला.
वांद्रेतल्या शाखेवर हातोडा
ठाकरे गटाची वांद्रेतील शाखा अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेनं कारवाई केलीय. वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीनं बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं. कुठलीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून त्याठिकाणी बोर्ड लावण्यात आले होते. शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर आज मुंबई महापालिकेनं कारवाई केली. पण, जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.
ठाकरेंच्या सुरक्षेत कपात
त्याआधी, काल ठाकरे कुटुंबियांच्या (Thackeray Family Security) सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली. इतकंच नाहीतर मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट व्हॅन कमी करण्यात आलीय. तसंच पायलटही कमी केलाय. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे.
निकटवर्तीयांवर ईडीचे छापे
दुसरीकडे, कोव्हिड सेंटर कथित घोटाळाप्रकरणीही ठाकरे गटाची कोंडी करण्यात आली आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणांच्या घरावरही ईडीने धाड टाकली. तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे. या संबंधित कंपन्यांकडून फायदा मिळवल्याचा आरोप असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. सूरज चव्हाण यांची तब्बल साडे सतरा तास ईडी चौकशी करण्यात आलीय. ईडीचे अधिकारी रात्री दीड वाजता सूरज चव्हाण यांच्या चेंबूरच्या घरातून निघाले. सकाळी आठ वाजल्यापासून ही चौकशी सुरू होती.
ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी
उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा एकत्र फोटो असलेले पोस्टर्स काही अज्ञातांनी लावले होते. मध्यरात्री लावण्यात आलेले हे पोस्टर्स शिवसैनिकांनी हटवले.. याप्रकरणी अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली नाही. मात्र पोलीस स्वत:हून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तसंच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिलाय.
ठाकरे गटाचा विराट मोर्चा
येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार आहे. एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.