मुंबई मनपाची नवी प्रभागरचना जाहीर, प्रभागवाढीचा शिवसेनेला लाभ?
मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर केल्या आहेत
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील 9 प्रभाग वाढणार आहेत. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात हे प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे याचा शिवसेनेला निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.
आज महापालिकेने वॉर्ड पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केलाय. मुंबई मनपात नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे. वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यावर हरकती आणि सूचना नोंदवल्या जाणार आहेत. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिवाळीपूर्वी घेतला होता.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चूरस ही शिवसेना आणि भाजप यांच्या असणार आहे. शिवसेनेला गेल्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा हा शहर आणि पूर्व उपनगरात झाला होता. आता नऊ प्रभाग वाढल्यावर शिवसेनेलाच याचा राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे.
या प्रभागांमध्ये होणार वाढ
वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला चेंबूर गोवंडीत प्रभाग वाढणार आहेत. एकूण जागांच्या ५० टक्के महिला आरक्षण म्हणजे १०९ जागा महिलांसाठी राखीव असतील. तर खुल्या प्रवर्गासाठी ११० जागा आहेत.