मुंबई पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार
मुंबई महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये बाळंतपणानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तेथील कर्मचारी पैसे उकळत होते. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत.
मुंबई : महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये बाळंतपणानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तेथील कर्मचारी पैसे उकळत असल्याची बातमी 'झी २४ तास'ने दाखवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात नातेवाईकांकडून तेथील महिला कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याची आणि पैसे स्विकारत असल्याची चित्रफित 'झी २४ तास'ने दाखवली होती.
तसेच पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारे नातेवाईकांची लूट होत असल्याचे अनुभव काही महिलांनी सांगितले होते. ही बातमी दाखवल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ माजली होती. तसंच ही चित्रफित कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयातील नसल्याचाच पवित्रा प्रशासनाने घेतला होता.
परंतु मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा डॉ अर्चना भालेराव यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. तसंच दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.