मुंबई : बेस्ट संपाच्या दरम्यान बेस्ट बंद पाडण्याचा डाव असल्याची चर्चा सुरू होती. आता बेस्टपाठोपाठ मुंबई महापालिका शाळांवरही टांगती तलवार आहे. मनपाच्या शाळाही मुंबईतून हद्दपार होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा एका पाठोपाठ एक बंद पडत आहेत. लालबाग या अस्सल मराठी विभागातली शाळा बंद पडली. पण मनपाला त्याचे सोयरसुतक नाही. विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचं सांगत थंडपणे शाळेला टाळे ठोकले. हीच स्थिती कायम राहिली तर २०२७ पर्यंत मुंबई मनपा शाळेत एकही विद्यार्थी दिसणार नाही असे सर्वेक्षण सांगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनपा शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा कमालीचा ढासळल्याचं पालक सांगतात तर दुसरीकडे वारंवार सुधारणा सुचवूनही शाळांची स्थिती, दर्जा सुधारत नसल्याचा आरोप संघटना करत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ११९२ शाळा आहेत. यात सध्या ३ लाख ११ हजार ६६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०१३-१४ साली संख्या ४ लाख ४ हजार २५१ इतकी होती. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत पालिका शाळांचे प्रवेश २३ टक्क्यांनी कमी झालेत. २००८ पासून २०१८ पर्यंत २२९ शाळा बंद पडल्या.


देशातली सर्वाधिक अर्थसंकल्प असलेली महापालिका म्हणजे मुंबई मनपा. पण शिक्षणाबाबतची ही आकडेवारी पाहिली तर महापालिकेला शाळा चालवायच्या आहेत की बंद पाडायच्या आहेत असा प्रश्न पडतो.