मुंबई : महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. बीएमसी आणि एमटीडीसी यांच्यात याबाबत करार झाला आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. याठिकाणी गाईडेड हेरिटेज वॉक सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेची वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. या वास्तूचं अंतर्बाह्य सौंदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत महापालिका आणि एमटीडीसीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला. 



महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.


पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचे स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचेही एक वेगळे महत्त्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जुन पाहावी, अशी ही वास्तू आहे. मुंबईला २४ तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे, असे ते म्हणाले. 


मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता ७० वरुन फक्त ९ या एकअंकी संख्येवर आणली आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे म्हणाल्या की, वानखेडे स्टेडीअमच्या हेरीटेज वॉकसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर एकाच आठवड्यात महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे मुंबईच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी चालवणारी मुंबई महापालिका कसे काम करते हे पाहणे पर्यटकांसाठी निश्चितच आनंददायी असेल, असे त्यांनी सांगितले.