एमआरआय मशीनमध्ये अडकून जीव गमावला, कुटुंबियांना भरपाई
राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश
मुंबई : नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीनमध्ये अडकून जीव गमावलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. फेब्रुवारी 2018 मधली ही घटना आहे. राजेश मारू हे त्यांच्या नातेवाईकाचे एमआरआय काढण्यासाठी नायर रुग्णालयात गेले होते. त्यावेळी ते ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन एमआरआय विभागामध्ये गेले होते.
सिलेंडर आत घेऊन गेलेल्या मारूंना मशिनच्या विद्युतचुंबकीय क्षेत्राने खेचले होते. त्यामुळे मशीनमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला होता. सिलेंडर आत नेताना रुग्णालय कर्मचारी किंवा डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारे आक्षेप घेतला नाही. राजेश यांचा या विचित्र अपघातात जीव गेला. रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत मारू कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यावर कोर्टाने निकाल देताना मारू कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई मनपा प्रशासनाला दिले आहेत. दहा लाखांपैकी पाच लाख रुपये फिक्स्ड् डिपॉझिटमध्ये ठेवावेत आणि उर्वरित पाच लाख रुपये सहा आठवड्यांत या कुटुंबाला द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.