अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...
Mumbai News : नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. पण, याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते.
Mumbai News : स्वप्ननगरी मुंबई अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये आजवर अनेकांनीच आसरा घेतला. या शहरानं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हातभार लावला आणि खऱ्या अर्थानं देशाला आर्थिक पाठबळही दिलं. आर्थिकदृष्ट्या देश सक्षम होत असताना मुंबईनंही महत्त्वाची भूमिका बजावली. पण, आता मात्र अनेकांची कर्मभूमी आणि अनेकांचीच जन्मभूमी असणाऱ्या या मुंबईतून मोठ्या संख्येनं नागरिक शहर सोडण्याच्या विचारात असल्याची बाब समोर आली आहे.
शहरातील नागरिक का करतायत मुंबई सोडण्याचा निर्णय?
मुंबईत सर्व सुखसोयी मिळतात असं म्हटलं जात असलं तरीही धकाधकीच्या या आयुष्यात शहरातील नागरिकांना मात्र अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी शहरातील दर 10 पैकी 6 नागरिक या शहरातूनच बाहेरच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याची बाब एका सर्व्हेक्षणातून समोर आली. दिल्लीतही हेच चित्र.
सकाळच्या वेळी असणारी प्रदूषणाची धोकादायक पातळी, त्यामुळं व्यायमावर लागलेला विराम आणि त्याचे शरीरावर, जीनशैलीवर होणारे अनिष्ठ परिणाम या कारणांमुळं नागरिक हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. चर्चा आणि सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत.
हेसुद्धा पाहा : Randeep Hooda Wedding Photo : रणदीप हुड्डा अडकला विवाहबंधनात; पहिल्यांदाच पाहायला मिळालं मणिपुरी लग्न
हिवाळ्यामध्ये श्वसनविकारांमध्ये होणाऱ्या वाढीसोबतच अनेकांचा अस्थमा (दमा) डोकं वर काढू लागला असून, या रुग्णांमध्ये साधारण 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळं शहरातील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत आतापर्यंत अनेक नागरिकांनी आसरा घेतला. यामध्ये परराज्यातील नागरिकांपासून परदेशातील नागरिकांचाही समावेश पाहायला मिळाला. पण, अनेकांनाच आसरा देणाऱ्या या शहरातील वाढती गर्दी, सुविधांवर येणारा ताण आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी या कारणांकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबई अर्ध्याहून अधिक रिकामीच झाली तर नेमकं काय होईल? विचार करून पाहा...