मुंबईकरांनी लांब उडी मारायची का? गोखले पुलाला जोडणाऱ्या बर्फीवाला पुलामध्ये सहा फुटांचे अंतर
Gokhale Bridge : महापालिकेच्या गोखले पुलावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. गोखले पूल ज्या पुलाला जोडण्यात येणार होता त्या पुलाची उंची कमी असल्याचे समोर आल्याने नेटकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे.
Gokhale Bridge : मुंबईच्या बहुप्रतिक्षित गोखले पुलाचा एक भाग नुकताच सुरु करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या गोखले पुलाचा काही भाग सोमवारी संध्याकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र आता या पुलावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. गोखले पूल खुला केल्यानंतरही अंधेरी पश्चिम येथील गोखले पुलाच्या सीडी बर्फीवाला पुलाचे मोजमाप न केल्याने महापालिकेला सोशल मीडियावर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
सोशल मीडियावर गोखले पुलाचे फोटो आता व्हायरल होत आहे. नवा कोरा गोखले बर्फीवाला पुलाला जोडताना उंचीचा मोठा फरक असल्याचे समोर आलं आहे. या पुलामध्ये तब्बल सहा फूटांचे अंतर शिल्लक आहे. या मोठ्या निष्काळजीपणाबद्दल मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आधीच विलंबाने बांधलेल्या या अर्ध्या पुलाचे उद्घाटनही मंत्र्यांनी निर्लज्जपणे केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग बर्फीवाला पुलाला जोडण्यात येणार होता. मात्र पुलामधील उंची जास्त असल्याने तो जोडण्यात आला नाही. मात्र 26 फेब्रुवारीलाच या पुलाचे उद्धघाटन करण्यात आलं. तसेच स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये अडथळा न आणता हा पूल देशातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर बांधण्यात आला असून देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच पूल असल्याचा दावा शिंदे सरकारने केला. तसेच यावेळी अभियंत्यांचेही कौतुक करण्यात आलं.
मात्र ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी याबाबत पोस्ट करत महापालिका आणि सरकारवर निशाणा साधला आहे. 'होय! केवळ भारतातीलच नाही, तर जोडताना 6 फूट उंचीचा फरक असणारा हा जगातील पहिलाच पूल असेल! महापालिकेचे आयुक्त आणि रेल्वे मंत्री यांना तात्काळ निलंबित करून या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी,' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा असल्याचे म्हटलं आहे. गोखले पुलाची उंची वाढली असताना त्याला बर्फीवाला पुलासोबत का जोडून पाहिलं नाही. या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, असे रवी राजा यांन म्हटलं आहे.
दरम्यान, गोखले आणि बर्फीवाला पूल यांच्यातील अंतराच्या मुद्द्यावर महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी पूल विभागाच्या अभियंत्यांची बाजू मांडली. यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे. पूल बांधणीत रेल्वेच्या धोरणामुळे हे घडल्याचे त्यांनी म्हटले. पुलाच्या बांधकामादरम्यान रेल्वेच्या नवीन धोरणामुळे पुलाची उंची दीड मीटरने वाढवावी लागली. गोखले पुलाच्या बांधकामादरम्यान बर्फीवाला पुलाचाही आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र अचानक गोखले पुलाची उंची वाढल्याने बर्फीवाला उड्डाणपूल जुन्या गोखले पुलाच्या खाली गेला. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी आमच्याकडे व्हीजेटीआय आणि आयआयटी सारख्या संस्था आहेत. आवश्यकता भासल्यास बर्फीवाला उड्डाणपुलापासून गोखलेपर्यंत वाहतूक सुरळीत चालण्यासाठी रॅम्प बसविण्याचाही विचार करू शकतो, असे पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोखले पुलाची उंची बर्फीवाला पुलापेक्षा दीड मीटरने जास्त आहे. त्यामुळे लोकांनी पुलाच्या डिझाईनची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर एका यूजरने, 'मुंबईकर लांब उडी घेऊ शकतात का?' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, 'चहल साहेब आता आयटी आणि व्हिजेटीआयवर हे सगळं ढकलणार. दोन पुलांमध्ये सहा फुटांचे अंतर आणि 50 अंश कोनाच्या घसरगुंडी टाकणार असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने यासाठी टाळ्या द्यायला हव्यात, असे म्हटलं आहे.