Mumbai News : कोरोनाच्या सावटानंतर एकिकडे एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गजन्य आजारानं डोकं वर काढलेलं असतानाच पुण्यात एकाएकी गिया बार्रे सिंड्रोम अर्थात जीबीएस या न्यूरोलॉजिकल आजारानं दहशत वाढवली. पुणे जिल्ह्यात गेल्या काही 
दिवसांपासून जीबीएस या आजाराचे जवळपास 111 रुग्ण सापडले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं पुण्यात परिस्थिती गंभीर असतानाच मुंबईत मात्र या आजाराचा अद्यापही कोणताही नवा रुग्ण आढळलेला नाही. असं असलं तरीही मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागानं  सद्यस्थितीचा आढावा घेत तयारी सुरू केली असून, पालिका रुग्णालयांमध्ये 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे. 


मुंबई शहरातील कोणत्याही शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कुठंही जीबीएसचा एखादा नवा रुग्ण आढळल्यास याबाबतची माहिती तातडीनं सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग विभागाला देण्याचे निर्देश देत जीबीएससाठी देण्यात येणारी सर्व औषधे शहरात उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. 


उपचार घेणं टाळू नका


प्राथमिक माहितीनुसार या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या चेतानासंस्थेवर हल्ला करते. श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर हा आजार डोकं वर काढतो. त्यामुळे स्नायू कमजोर होऊन गंभीर रुग्णांमध्ये पक्षाघातही होऊ शकतो.  त्यामुळं या आजारावर तातडीनं उपचार करणं गरजेचं असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. 


लक्षणं काय? 


हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवणं
चालण्यात त्रास जाणवणं 
अतिसार 


काय काळजी घ्यावी? 


पाणी उकळून प्यावं
ताजं अन्न घ्यावं
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
हात, पाय दुखणे आणि अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांना दाखवावं. 


हेसुद्धा वाचा : काळजी घ्या! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल



उपचारांसाठी विशेष व्यवस्था करा - फडणवीस 


जीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत जीबीएसबाबत आढावा घेत त्यांनी या सूचना दिल्या. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असून, अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी असं त्यांनी स्पष्ट केलं. 


जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेल्या अन्नाच्या सेवनामुळं होतो त्यामुळे अशा प्रकारचे अन्नपदार्थ टाळावेत, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला केल्या. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणं आढळल्यास मार्गदर्शन आणि उपचाराकरिता वैद्यकिय सल्ला घ्यावा असं आवाहन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं आहे.