Mumbai Coastal Road : आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या धाटणीच्या बांधकामाचं कमाल उदाहरण असणाऱ्या (Mumbai News) मुंबईतील कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गाचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शहराला हा नवा मार्ग मिळाला आणि यानिमित्तानं वरळी - मरिन ड्राईव्ह (Worli- Marine Drive) हे अंतर बऱ्याच फरकानं कमी झाल्याचा अनुभव अनेक मुंबईकरांनी घेतला. सध्याच्या घडीला अनेकांच्या कुतूहलाचा विषय असणाऱ्या या कोस्टल रोडवरून बऱ्याचजणांनी प्रवास केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवास करणारा प्रत्येकजण समुद्राला मागे हटवत बांधण्यात आलेल्या या मार्गाला पाहताना भारावून गेला. खुद्द महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रासुद्धा यास अपवाद ठरले नाहीत. नवनवीन प्रकल्पांबाबत सजग असणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनीही कोस्टल रोडवरून प्रवास केला. 


जिथं एकिकडे सोशल मीडियावर अनेकजण कोस्टल रोडचे फोटो शेअर करत होते तिथं महिंद्रा यांनी थेट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अंतरंग सर्वांसमोर आणले. आपल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते कोस्टल रोडमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. 'तुम्ही L&T नं  बांधलेल्या भारतातील पहिल्या सागरी बोगद्यामध्ये प्रवेश करत आहात' असा फलक कोस्टल रोडवरील बोगद्याच्या प्रवेशाच्याच ठिकाणी लावला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आणि पुढे अवघ्या काही सेकंदांमध्ये हा प्रवास उलगडत जातो. 


हेसुद्धा वाचा : Mumbai Coastal Road : काहीतरी गंडलं! लोकार्पणानंतर पहिल्याच दिवशी कोस्टल रोडवरील प्रवास वेळेत बदल 


आपण केलेल्या या अद्वितीय प्रवासाविषयी सांगताना ट्विटमध्ये आनंद महिंद्रा लिहितात, 'आज मी टनल टुरिस्ट होऊन मुंबईतील नव्या कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या सागरी बोगदा पाहिला. इथून प्रवास करण्यासाठी मी प्रचंड वाट पाहिली आणि खरंच ही प्रतीक्षा फळली असं म्हणाव लागेल. तुम्ही कमाल केली आहे L & T'. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या ट्विटवर त्यानंतर लगेचच नेटकरी व्यक्त होऊ लागले. 



आतापर्यंत ज्यांनीज्यांनी या कोस्टल रोडचा प्रवास केला त्या सर्वांनी आपआपले अनुभव सांगितले. तर, ज्यांनी अद्याप या मार्गावरून प्रवास केला नाही, त्यांनी प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग असं नाव असणाऱ्या या मुंबईतील कोस्टल रोडवरून पहिल्या दिवशी 16 हजार वाहनांनी प्रवेश केल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातीला या रस्त्यानं प्रवेश करण्यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतची वेळमर्यादा आखण्यात आली होती. पण, वरळी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता आता वरळीचून कोस्टल रोडसाठीचा प्रवेशमार्ग सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरु राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.