Mumbai Coastal Road : मुंबई शहराला विकासाच्या मार्गावर अतिशय वेगानं पुढे नेणाऱ्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण मागील काही दिवसांमध्ये झालं. मुंबईतील सागरी किनारा मार्ग अर्थात शहरात नव्यानं उभारण्य़ात आलेला कोस्टल रोड त्यापैकीच एक. नुकतंच शहरातील कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलं. ज्यानंतर पहिल्याच दिवशी या मार्गावरून जव ळपरास 16 हजार वाहनांनी प्रवास केला.
कोस्टल रोडच्या लोकार्पणानंतर प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी शहरातील वाहनांनी या रस्त्यानं प्रवास केला. यातही तीनचाकी वाहनं, मालवाहतुकीची वाहनं, दुचाकी यांना या वाटेनं प्रवेश नाकारण्यात आला. इथं कोस्टल रोडसंदर्भात अनेकांनाच कुतूहल असताना तिथं एका दिवसातच या वाटेनं प्रवास करण्यासाठीच्या वेळांमध्ये पुन:श्च बदल करण्यात आला.
सुरुवातीला या वाटेनं दिवसभर प्रवास सुरु राहील अशी अनेकांचीच अपेक्षा असताना तिथं वेळंच बंधन लागू करण्यात आलं आणि आता या निर्धारित वेळेमध्येही काही बदल करण्यात आले असून वरळीतून (Worli) प्रवेशासाठी फक्त 5 वाजेपर्यंत मर्यादा घालून देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणारा, शहराला एक नवी दिशा देणारा कोस्टल रोड सुरु झाला आणि इथं पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांनी तंत्रज्ञानाच्या आविष्काराला प्रत्यक्षात अनुभवलं. पहिल्याच दिवशी या मार्गानं आलेल्या कैक वाहनांनी बहुतांशी दुपारी तीन ते चार हाच वेळ निवडल्याचं पाहायला मिळालं. दुपारच्या वेळेत कोस्टल रोडवर येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त होती. तर, संध्याकाळी मात्र उपनगराच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याची बाब निदर्शनास आली.
उपनगराच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांमुळं शहरात वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसली. हीच समस्या टाळण्यासाठी वरळीतून कोस्टल रोडसाठीचा प्रवेशमार्ग रात्री आठ ऐवजी संध्याकाळी पाच वाजताच बंद करण्यात आला असून यापुढंही वरळीतून जाणारा प्रवेशमार्ग दररोज सायंकाळी पाच वाजताच बंद केला जाणार आहे.