Mumbai News : मुंबईच्या (Mumbai) वाढत्या गर्दीत मुंबईकरांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local) आणि बेस्टची बस (BEST Bus) ही उत्तम पर्यायी व्यवस्था आहे. मात्र प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. मात्र प्रशासनाकडून कमी पैशात उत्तम सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. तरीही काही प्रवासी हे स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत असतात. मुंबई लोकलमध्ये अशा प्रकारची स्टंटबाजी नेहमीच पाहायला मिळत होती. पण आता मुंबईच्या बेस्ट बसमध्ये देखील अशी स्टंटबाजी पाहायला मिळत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या बेस्टबसमधील स्टंटबाजीचा हा व्हिडीओ वांद्रे परिसरातील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुण बसला लटकून प्रवास करताना दिसत आहेत. सुरुवातीला बसमधील गर्दीमुळे ते लटकून प्रवास करत होते असं वाटत होतं. मात्र सत्य समोर आल्यानंतर लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. एक्स म्हणजे पूर्वीचे ट्वीटर या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बांद्रा बझ नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.


हिरोगिरी करण्याच्या नादात, संध्याकाळी वांद्रे येथील कार्टर रोड येथे दोन विद्यार्थी एका चालत्या बेस्ट बसच्या छोट्या कड्यावर धोकादायकरित्या उभे असताना दिसले, असे कॅप्शन या व्हिडीओसोबत जोडण्यात आले आहे. दरम्यान, सुरुवातीला गर्दीमुळे या विद्यार्थ्यांनी असा प्रवास केला असेल असं वाटत असेल. पण तसंही नाहीये. व्हिडीओमध्ये बस स्टॉपवर कोणतीही गर्दी नव्हती. तर अन्य प्रवासी शिस्तीत बसमध्ये चढत होते. असे असतानाही या दोन विद्यार्थ्यांनी मुद्दाम बसला लटकून प्रवास केला आहे.



दरम्यान, एका युजरने या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत बसबाबत माहिती दिली आहे. "ही गाडी वांद्रे आगार, वांद्रे पश्चिमची असून कृपया सदर प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व असे वायफळ स्टंट केल्यास काय कारवाई / शिक्षा होऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण सोशल मीडिया माध्यमातून आम्हा जनते समोर पेश करावे ही नम्र विनंती," असे या युजरनं म्हटलं आहे.