Mumbai News : मुंबईला खऱ्या अर्थानं हायटेक करण्याच्या उद्देशानं प्रशासन पावसं उचलत असतानाच आता त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहे. सध्याच्या घडीला शहरातील विविध भागांना जोडण्यासाठी मोने, मेट्रो आणि मोठाल्या उड्डाण पुलांसह कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांवर शहरात वेगानं काम सुरु आहे. त्यात आता आणखी एका प्रकल्पाटी जोड मिळत असून हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांसाठी मदतीचा ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतुकीचं विभाजन करत त्या मार्गे वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 800 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन्ही महामार्गांवर असणाऱ्या चार जंक्शनवर भुयारी आणि उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात या महामार्गांच्या रुंदीकरणाला फारसा वाव नाही. मध्ये असणारी पाणथळ जमीन, मिठागरं यांमुळंही इथं फार अडचणी येत आहेत. त्यातच वाहतूक कोंडीची समस्याही सातत्यानं डोरं वर काढत अलल्यामुळं आता इथं भुयारी आणि उन्नत मार्गांचा पर्याय शोधला जात आहे. 


कोणकोणत्या टप्प्यांवर सुरु होणार प्रकल्पाची कामं? 


पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधीर फडके उड्डाणपूल येथून महामार्गावर जाण्यासाठी थेट मार्ग नसल्यामुळं इथं दक्षिण मुंबईच्या दिशेनं येणारा भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. बीकेसी कनेक्टर विस्तारालाही या प्रकल्पाअंतर्गत केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असून, इथं U आकाराच्या धर्तीवर पूल बांधण्यात येईल. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी! 


मिलन सबवेची रचनाही बदलणार? 


वाकोला आणि सांताक्रूजच्या पूर्वेकडे होणारी वाहतूक कोंडी पाहता इथंही काही पर्यायांचा विचार केला जाणार आहे. मार्च महिनाअखेरीस या कामाला सुरुवात होऊन मिलन सबवेची रचना बदलू शकते. 


येत्या काळात शहरात अनेक निर्माणाधीन प्रकल्प पूर्णत्वास जाणार असून त्यामुळं शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल होताना दिसणार आहेत. शहरातील उपनगरं आणि बहुतांश भाग मुख्य प्रवाहातील ठिकाणांशी जोडला जाणार असून, वाहतूकही विविध भागांमध्ये आणि टप्प्यांमध्ये विभागली जाणार आहे. त्यामुळं शहर वाहतूक कोडींतून मुक्त होईल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.