VIDEO: `कितीवेळा सांगितलं तरी...`; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mumbai News : मुंबईच्या रेल्वे स्थानकांसह रस्त्यांवर पान किंवा गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांची कमी नाहीये. वारंवार सांगून, दंडात्मक कारवाई करुन अशा लोकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. मागचा पुढचा विचार न करता अनेकजण बिंधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे थुंकतात. मात्र त्यानंतर ज्यांना ते साफ करावं लागतं त्यांच्याबद्दल जराही सहानुभूती अशा लोकांमध्ये नसते. असाच एक प्रकार मुंबईमधून समोर आला आहे. मात्र यावेळी याची दखल थेट आयएएस अधिकाऱ्याने घेतली आहे.
लोक कसलाही मागचा पुढचा विचार न करता रस्त्यात, रेल्वे स्थानकांवर थुंकत असतात. अनेक सरकारी संपत्तीचे यामुळे नुकसान होतं की त्या खराब दिसतात. भारतीय रेल्वेला ही घाण साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील असाच एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी मेहनत करताना दिसत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. खांबावरील पान आणि गुटख्याचे डाग काढण्यासाठी ही महिला स्वच्छता कर्मचारी धडपडत आहेत. सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कितीही प्रयत्न केले तरी लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अशा प्रकारचे कृत्य करताना रोजच पाहायला मिळतात.
व्हिडीओमध्ये महिला फारच त्रस्त दिसत आहे कारण वारंवार प्रयत्न करुनही खांबावरील गुटख्याचे डाग जात नाहीयेत. व्हिडीओमध्ये महिला, "कितीवेळा सांगितलं तरी लोक ऐकत नाही. प्लिज थुकू नका असं कित्येक वेळा सांगितलं तरी जबरदस्तीने थुकून जातात. काय करणार आपलं काम देखील करावं लागतं," असे म्हणत आहे. त्यानंतर व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती, मी तुमचा हा व्हिडीओ योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन तुम्हाला ही घाण साफ करावी लागणार नाही, असे म्हणत आहे.
व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी महिला कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि लोकांमध्ये कोणताही बदल होत नसल्याबद्दल दुःख व्यक्त केले. असे व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित त्या लोकांमध्ये बदल दिसून येईल, असे नेटकऱ्यांचे म्हणणं आहे. तर काहींनी गुटखा आणि तंबाखूवर बंदी घातली पाहिजे, असे म्हटलं.