Ram Navmi 2024 : ...खबरदारी घ्या, कारवाई करा! रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश
Ram Navmi 2024 : रामनवमीच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्टपणे सांगत काही आदेश देत या आदेशांचं पालन करण्यात यावं अशा सूचनाही केल्या आहेत.
Ram Navmi 2024 : यंदाच्या वर्षी देशभरात राम नवमीचा उत्साह द्विगुणित होणार आहे. कारण असेल ते म्हणजे अय़ोध्येत उभारण्यात आलेलं राम मंदिर. दरवर्षी देशातील कैक राम मंदिरांमध्ये जल्लोषात राम नवमीचा उत्साह साजरा केला जातो. यंदा या उत्साहात आणखी भर पडणार आहे. पण, असं होत असताना कुठंही इतर धर्मांसंदर्भातील कृती किंवा तत्सम गोष्टींमुळं सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याविषयीची काळजी घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला खबरदारीचे आदेश दिले आहेत.
राम नवमीच्या निमित्तानं राज्यातील विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येतात. प्रसंगी कुठंही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मुंबईतील मालाड मालवणी येथे असणाऱ्या मुस्लीम बहुल भागातून यात्रा किंवा मिरवणुका काढण्यात येतात. मात्र या भागातील मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असतानाच तिथून मोठ्या आवाजत ढोल-ताशे वाजवत या मिरवणुका पुढे नेल्या जातात अशी तक्रार पुढे आल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले.
न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठानं हे आदेश पारित केले. यात्रा किंवा मिरवणुका काढण्यापासून न्यायालय कोणालाही रोखू शकत नाही. पण, अशा प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागणार नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची असून, त्यासाठीच पोलीस यंत्रणांनी सतर्क राहत कुठंही नियमांची पायमल्ली होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करावी असं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आहे.
हेसुद्धा वाचा : RBI News : बँक खातेधारकांना धक्का; कर्ज राहिलं दूर, आता खात्यातून काढता येणार अवघे 15000 रुपये
राम नवमीच्या निमित्तानं विविध भागांमध्ये निघणाऱ्या सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुकांच्या धर्तीवर नेहमीच्या वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत की नाही याबाबत पाहणी करण्यासोबतच या यात्रांदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.