Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू ओढावला. अतिशय भीषण अशा या अपघातात काही कळायच्या आतच परिस्थिती इतकी बिघडली, की निष्पापांवर काळानं घाला घातला. याच भीषण अपघातातली भीषण दृश्य आता समोर येण्यास सुरुवात झाली असून, घटनास्थळी बसच्या चाकाखाली माणुसकीसुद्धा चिरडली आणि तिचा अंत झाला. हेच सांगणारा एक व्हिडीओ नव्यानं समोर आला आहे. जिथं, अपघातात मरण पावलेल्या महिलेचे दागिने चोरीला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुर्ल्यात झालेल्या भयानक अपघातात फक्त माणसंच नाही तर माणुसकीचाही क्रूर अंत झाला. असं म्हणण्यास कारणीभूत ठरतोय तो म्हणजे एक व्हिडीओ. कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. त्यात कनिस अन्सारी या महिलेचाही जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील बांगड्या काढून घेतल्या. मोबाईल कॅमेरात ही चोरी कैद झाली आहेत. 


हा अज्ञात इसम मदतीच्या बहाण्यानं मृत महिलेच्या बांगड्या काढत होता. मोबाईलवर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला नंतर ही बाब लक्षात आली. बांगड्या चोरणारा व्यक्ती कोण हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. मात्र मृत महिलेच्या हातातल्या बांगड्या चोरणारा हा व्हिडिओ पाहताना कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल हे खरं. 



दरम्यानत कनिस अन्सारी या तिथं एका दवाखान्यात काम करत होत्या. सोमवारी त्यांना रात्री 8 वाजता दवाखान्यात पोहोचायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांना उशीर होत असल्याचा निरोप आला. पुढे आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी. या भीषण अपघातामध्ये अन्सारी यांना जीव गमवावा लागला. पण, घटनास्थळी पीडितांची मदत करण्याऐवजी बघ्यांनी संधी साधत चोरीचा डाव केला आणि माणुसकीला काळीमा फासला. 


हेसुद्धा वाचा : खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू


सदर अपघातातील आणखी एक CCTV फूटेज समोर आलं असून हे CCTV फुटेज त्या बसमधील असल्याचं सांगितलं जात आहे. बस जात असताना अचानक अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये उडालेली खळबळ, प्रवाशांमध्ये पसरलेलं भीतीचं वातावरण या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 


अपघात झाला, निष्पाप बळी गेले; अहवाल मात्र अद्यापही प्रतीक्षेत 


सोमवारी झालेल्या कुर्ला बस अपघातानंतर या प्रकरणावर 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करेल असं सांगण्यात आलं असून, सध्या बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही अहवालाची प्रतीक्षा मात्र कायम असून, पुढील 10 दिवसांत अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.