Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट
Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Mhada Lottery 2024 : मुंबईचा मूळ रहिवासी आता राहिलाय कुठे? असा उद्विग्न प्रश्न अनेकांनीच उपस्थित केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतून अनेक मूळ रहिवाशांनी त्यांचा मुक्काम थेट उपनगरांच्या दिशेनं वळवला आणि पाहता पाहता शहरात नवी लोकसंख्या वाढली. या शहराची लोकसंख्या आणि सीमा झपाट्यानं वाढल्या असल्या तरीही इथं हक्काचं घर मोक्याच्या ठिकाणी असावं हे स्वप्न पाहणाऱ्यांना ते साकारण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे.
आता मात्र अनेकांच्याच हक्काच्या घरासाठीच्या प्रयत्नांना यश लाभणार असून, यामध्ये मोठी मदत होणार आहे ती म्हणजे म्हाडाची. कारण, म्हाच्या एका नव्या योजनेअंतर्गत काळाचौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मान्यता मिळाली आहे. म्हाडाकडून अभ्युदय नगर (काळाचौकी), आदर्श नगर (वरळी) आणि वांद्रे कॉलनीच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव सागर केला होता, ज्यामधून काळाचौकीतील प्रस्तावाला सध्या मान्यता मिळाली असून, उर्वरित दोन वसाहतींच्या प्रस्तावासाठीची मान्यता अद्याप प्रतीक्षेत आहे.
किती घरं उपलब्ध होणार?
साधारण 33 एकर भूखंडावर उभ्या असलेल्या काळाचौकीतील प्रकल्पावर सध्या 49 इमारती असून, येथील लोकसंख्या 3350 इतकी असल्याची माहिती म्हाडानं दिली आहे. या प्रकल्पाच्या पुनर्विकासातून म्हाडाला 10 हजारांहून अधिक घरं उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे. रेल्वे स्थानक, भाजी मंडई, शहरातील सांस्कृक केंद्र म्हणून नावारुपास आलेला भाग आणि रुग्णालयांसह मोनो, मेट्रो अशा अनेक सुविधा हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या भागात 2 बीएचकेची घरं म्हाडा उपलब्ध करून देणार आहे.
हेसुद्धा वाचा : LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका
वरील भागामध्ये पुनर्विकास होण्यापूर्वी विकासकांकडून रहिवाशांना पर्यायी भाडं आणि कॉर्पस फंड देणं बंधनकारक असेल. शिवाय हा गृहप्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी त्यावर गृहनिर्माण विभागाचील अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीचं लक्ष असेल. दरम्यान, अभ्युदयनगरसह वांद्रे रेक्लेमेशन आणि वरळीतील आदर्श नगर या दोन्ही प्रकल्पांनाही राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यास म्हाडाच्या वतीनं या पुनर्विकास प्रकल्पातून सुमारे 33 हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. तूर्तास या तीनपैकी एकाच ठिकाणच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळं आता इथंच अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत हे मात्र नक्की.