Viral News : सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग आहे. सासू सासरे त्यांच्या सूनेला स्वतःची मुलगी म्हणून घरात घेऊन येतात. मात्र अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये वारंवार खटके उडतात आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. कधीकधी तर हसती खेळती कुटुंबे विखुरली देखील जातात. मात्र आता बदलत्या काळानुसार  सासू-सुनेच्या नात्यांमध्येही बदल दिसून येत असून त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत. अशातच एका सासूने तिच्या सूनेला किडनी दान केली आहे. या अवयवदानानंतर सुनेला जीवनदान मिळालं आहे. मोठ्या मनाच्या या सासूचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. जगातील सर्व सासूंनी याचा आदर्श घ्यावा असेही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. "देशातील अतिशय दुर्मिळ घटना आमच्या सत्यम टॉवर सोसायटीमध्ये घडली. मोटा परिवारातील सून अमिषा जितेष मोटा (43) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असता प्रभा कांतीलाल मोटा (70) या त्यांच्या सासूची किडनी जुळली व सासूने आनंदाने सूनेला किडनी दान केली. मंगळवारी नानावटीला ऑपरेशन झाले. सून अजून इस्पितळात आहे.सासूचे घरी आगमन झाले त्यावेळी त्यांचे असे स्वागत झाले. मोटा परिवाराने विशेषतः प्रभाजींनी घालून दिलेला आदर्श विश्वातील समस्त सासूंनी अनुसरावा. प्रभाजींचे मनःपूर्वक अभिनंदन!," असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.



दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीमुळे अवयव दानाचे महत्त्व वाढत चाललं आहे. मात्र अवयवदान करण्याची मोहित संथ गतीनेच सुरु आहे. सध्याच्या घडीला राज्यात किडनी या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.  अनेकवेळा दोन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रत्यारोपण हा एकाच मार्ग रुग्णासमोर उरतो. किडनी मिळाली नाही तर रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते. मात्र अशा रुग्णाला किडनी मिळाली की त्याचे आयुष्य वाढू शकतं. मात्र राज्यात 5,832 रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  यासोबत इतर अवयवांच्या प्रतिक्षेत अनेक रुग्ण आहेत.


अवयवनिहाय राज्यातील रुग्णांची प्रतीक्षा यादी


किडनी  - 5,832


लिव्हर  - 1,284


हृदय - 108


फुप्फुस - 48


स्वादुपिंड - 35


छोटे आतडे - 3


हात - 3