लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार; शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याचा आरोप
Lalbaugcha Raja : मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशमुर्तींच्या सजावटीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गणपतीच्या पायावर राजमुद्रेची प्रतिमा असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलीस तक्रार केली आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील (Mumabi News) प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर (lalbaugcha raja) कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने (maratha kranti morcha) मंडळाविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा (rajmudra) अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाने केला आहे. मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले पितांबर लालबागच्या राजाला नेसवलं आहे. तसेच ती राजमुद्रा गणेश मूर्तीच्या पायावर ठेवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा मंडळाचे 90 वे वर्ष आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने मंडळाने यंदा रायगडाचा देखावा उभारला आहे. त्यामुळे मंडळाने गणेश मंडपात तशा प्रकारची सजावट केली आहे. यासोबत लालबागचा राजाची मूर्ती देखील तशीच सजवली आहे. मात्र लालबागचा राजाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवप्रेमींनी या गोष्टीला आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. दुसरीकडे सकल मराठा समाजानेही आक्रमक पवित्रा घेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव देवाऱ्हात
"छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा या मागचा नेमका हेतू काय होता? हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबाग च्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे. लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे देव देव्हाऱ्यात आहेत. आणि ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायावर पहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे
हा वाद कुठल्याही प्रकारे वाढवायचा नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाची आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाकडून अद्याप देखील कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण न आल्याने मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालबागच्या राजा मंडळाने समाज माध्यमाद्वारे किंवा मीडियाद्वारे तात्काळ या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. राजमुद्रा प्रकरणी बदल न केल्यास पुढील भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.