Mumbai News : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कुलाब्यातील नरिमन हाऊसमध्ये (Nariman House) दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षा वाढवली आहे. 2008 मध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आले होते आणि तिथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. अशातच राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) तपासादरम्यान एका संशयित दहशतवाद्याकडून नरिमन हाऊसच्या गुगल लोकेशनचे फोटो मिळाले आहेत. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयएला दहशतवादी संशयितांच्या ठिकाणाचे गुगल फोटो मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे एटीएसच्या चौकशीत दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित काही आरोपींची चौकशी केली होती. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एनआयएने आरोपींची चौकशी केली आणि त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल लोकेशनचे फोटो असल्याचे आढळले. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली. यानंतर मुंबई पोलिसांनी गुरुवारी नरिमन हाऊसभोवती मॉक ड्रील करून तेथील सुरक्षा वाढवली.


कोथरूड पोलिसांना हव्या असलेल्या दोन दहशतवादी संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी एटीएसने गेल्या आठवड्यात पुण्यातील एका रहिवासीला अटक केली होती. त्यानंतर रत्नागिरी आणि गोंदिया येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली. दोन्ही संशयित दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्यांनी अटक केली होती. मात्र तपासात दोघेही दशतवादी संघटनेशी संबधित असल्याचे समोर आले. एनआयए या दोन्ही संशयितांचा राजस्थानमधील एका दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यात शोधत होती.



दोघेही आरोपी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते आणि त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. त्याचवेळी ते आणखी काही योजनांवरही काम करत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद इम्रान (23), मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस आणि मोहम्मद याकूब साकी (24) यांचा समावेश आहे. हे सर्व मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्र एटीएसने या चौघांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कॉम्प्युटर, लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. चार आरोपींपैकी दोघांच्या भाड्याच्या घरातून स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. याचा वापर त्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चाचणी स्फोटांसाठी केला होता.