Mumbai News : मुंबईच्या चौपाट्यांवर पुन्हा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी जेलीफिशने (jellyfish) दंश केल्याच्या घटना समोर येत आहे. रविवारी संध्याकाळी जुहू चौपाटीवर (juhu beach) सहा पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश होता. उचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) यासंदर्भात माहिती देत जुहू चौपाटीवर जाणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या सहा जणांना जेलीफिशने दंश केला. त्रास होऊ लागल्यामुळे या सहा जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेहताब शेख(20), दिक्षाद मेहता (5), महम्मद अहर मन्सूरी (साडेचार वर्ष), मेटविश शेख (6), मोहम्मद रजाउल्लाह (22) , आर्थिया (26) अशी जेलीफिशने दंश केलेल्या सहा जणांची नावे आहेत. 


सर्व जणांना जवळच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 2018 मध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान गिरगाव चौपाटी येथे मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात गेलेल्या जेलीफिशने अनेकांना चावा घेतला होता. त्यानंतर आता वारंवार जेलीफिश मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून येत आहेत.


"गेल्या काही दिवसांपासून जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. रविवारी काही जणांना त्यांनी दंश केला. त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौपाटीवर जेलीफिश आढळत असून येथे येणाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन मेगाफोनद्वारे सतत केले जाते. मात्र, सायंकाळनंतरही अनेक पर्यटक चौपाटीवर येतात. अंधारात जेलीफिश किनाऱ्यावर असल्याचा अंदाज त्यांना येत नाही. त्यामुळे अनेकांना दंश होण्याच्या घटना घडत आहेत," असे मुंबई अग्निशमन दलाचे जुहू चौपाटीवरील वरिष्ठ जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी सांगितले. 


किनाऱ्यावर का येत आहेत जेलीफिश?


उच्च दाबाच्या एलईडी विजेच्या दिव्यांमुळे आकर्षित होऊन जेलीफिश किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढलं आहे. समुद्रात मासेमारी करण्यासाठी 2 ते 3 हजार वॅटचे दिवे लावले जात आहेत. या दिव्यांमुळे माशांबरोबरच समुद्रातील धोकादायक व विषारी जेलीफिशही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. तसेच किनाऱ्यावर येत आहेत.


काय काळजी घ्याल?


पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर येत असतात. त्यामुळे जेलीफिशने दंश करण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या महिन्यांत समुद्रात शिरू नका आणि चौपाटीवर अनवाणी फिरू नका, असे आवाहन समुद्र जीवरक्षकांनी केले आहे.