मुंबई हादरली! आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, 23 वर्षांच्या लेकावर चाकूने वार
Crime News In Marathi: आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News In Marathi: आईनेच तिच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात ही घटना घडली आहे. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. शनिवारी 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
आरोपी महिलेचे नाव बिंदुदेवी दुबे असं आहे. तर, मुलाचे नाव शिवकुमार दुबे असं आहे. बिंदूदेवी हिने मुलावर चाकुचे वार करत त्याची हत्या केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेची मानसिक अवस्थाही ठिक आहे. म्हणजेच तिने कोणत्याही दबावाखाली येऊन मुलाची हत्या केलेली नाही, असं पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. डीसीपी राज टिळक रोशन, यांनी ही माहिती दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार हा व्यसनी होता. तो काहीच कमवत नसायचा तर संपूर्ण दिवस दारू पित असायचा. तर, त्याची आई घरकाम करुन पैसे कमवत होती. शिवकुमार हा रोज तिच्याकडून पैसे मागायचा. त्या पैशातून तो दारू प्यायचा. त्याच्या या स्वभावामुळं त्यांच्यात रोजची भांडणं व्हायची. त्याच वादातून महिलेने तिच्या मुलाची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार ह्याचे त्याच्या आईसोबत खूप मोठे भांडण झाले. त्या भांडणातूनच त्याने तिच्यावर हात उचलला. शिवकुमार यांने बिंदुला मारहण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी बिंदूने जवळच असलेल्या चाकूने शिवकुमारवर वार केले. बिंदूचा हा घाव त्याच्या वर्मी बसला आणि त्यातच तो मरण पावला.
स्थानिकांनी शिवकुमार ह्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात जोगेश्वरी येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ओशिवरा पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिवकुमारच्या आईला अटक केली आहे.
पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारला ज्या रुग्णालयात दाखल केले होते तिथे बिंदू देवी पोहोचल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदू देवी या पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. आरोपी महिला पोलिसांना समाधानकारक उत्तरेदेखील देत नव्हती. त्यामुळं संशय आणखी बळावला. पोलिसांनी बिंदूदेवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.