Mumbai Crime News: मुंबईसह महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. तसाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईत घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांताक्रुझ येथील शाळेत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिपायानेच बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिपायाला अटक केली आहे. (Mumbai News Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी शनिवारी शाळेतील शिपायाला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांच्या मुलीवर शाळेतच वारंवार अत्याचार करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून हा घृणास्पद प्रकार सुरू होता. तसंच, याबद्दल कोणाला काही सांगायचे नाही, अशी धमकीही आरोपी शिपायाने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळं घाबरून तिने कोणालाच काही सांगितले नाही. 


समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. तिला व्यवस्थित चालण्यास त्रास होत होता. त्यामुळं तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तेव्हा या सगळ्या प्रकाराला उलगडा झाला. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. मुलीवर बेतलेल्या या प्रसंगाने पालकांना एकच धक्का बसला होता. 


पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत नेमकं काय घडलं याची विचारणा केली. तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या जबाबानुसार, पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा लोअर परेल येथील रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून तो या शाळेत काम करत होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या काळात आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला शाळेतीलच एका खोलीत नेले आणि तिथे तिला मारहाण केली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसंच, आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केल्याचे समोर आहे आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीने शाळेतील इतर मुलांसोबतही काही गैरप्रकार केलाय का? याचा शोध शाळा प्रशासन आणि मुंबई पोलिस घेत आहेत. 


आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि लहान मुलांचे संरक्षण कलम 6 (उत्तरित लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळं परिसरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.